Posts

शून्य सावली

निवांत भेटू बसू, बोलू उण्या दुण्याने दुनियेचं बरं वाईट नाही होणार नि गीता, घटना, इत्यादीला साक्षी ठेवून कुणाच्याही भावना दुखणार नाहीत किमान इतक तरी मन मोकळं होऊ. तुझा सल्ला, मत नि माझी झालेली गत आप आपल्या जागी तटस्थ ठेऊन मध्यम मार्ग सापडेल इतकंच खोलवर जाऊ. राजकारण, गर्दीचं निष्ठुर गणित, बकालपणा, समजूतदारपणा ही भानगड (देशद्रोह?) नको आपल्यात. मरण्याची तर गोष्टच सोड. हतबलता नशीब देव आपल्या हातात काय असतं? तत्सम शब्दांचं वजन वाहण्यापेक्षा बघूया भारनियमन कमी करता येईल का! नाही, परिपूर्ण नको होऊया आपल्यालाही कदाचित एखाद्या छोट्या समाजाचा अवतार बनवतील अवघड होऊन बसेल सारंच... जाताना मात्र मला घरापर्यंत सोबत दे शून्य सावलीही म्हणतात होत असते जगात...

मृगजळ

परतून येतील दिन कसे पुन्हा हा प्रश्न नि हा छंद, उरला जुना विरला क्षण झोकात, कुठे बरसला शोधतोय वास्तव कठोर, कसा हरवला उणिवांचं नव्हतं काही, जीव जडला काहीतरी मुद्दा हवाच चूक झाकायला अंदाज चुकला कुठे, कुणी वर्तवला गहन विचाराअंती मेंदू निवर्तला थेंबांना कळला होता गोंधळ मनातला सांभाळूनी खरच हा वादळ शमवला राहू दे आग थोडी, उरात कहर हा परतून येतील दिन मृगजळ असा उरला

पूर्णविराम

नाही थांबत मन मरेल एक वेळ इथे पूर्णविराम हवाय. तुझे विचार कुठवर पोहोचलेत तपासत राहा स्थितप्रद्न्य राहण्यापेक्षा किमान बदललेलं बरं नंतर नंतर तर कुणी विचारत देखील नाही मग शब्दांचे फेर कितीही धर वृद्ध मनसुद्धा विचार करते... त्या आधीचं बाकी सारं आलंच आहे... नि जन्मत राहिल काना कोपऱ्यातील कोळी जाळं विणून वाट बघतोय "हा सुद्धा त्यात सापडला तर..." अर्थात तुला खाणार नसला तरी विचार करतच असेल ना तो? पाटी कोरी राहते कधी कधी नि मग त्यावर उमटलेल्या कधी काळच्या रेघा अलगद दिसू लागतात चूकसुद्धा विचार करून कृतीत उतरवता येते कशाला कुणाचं भलं करावं? हा मग सुविचार होतो.

अहंकार

उतरून वाटेवरून पसरत गेलेलं जग पायाखालची जमीन तिथेच ठेवून माझं कोण कुठे आहे? शोधत फिरतो अनवाणी अनोळखी वाटा सांभाळून घेतात तू दूर का? मोहाचा आवाका मिटत नाही... पहिल्या पावसाची वाट सांग, मी भिजू नको? पूर्वेचं पश्चिमेला सूर्य सांगतो सगळं दृष्टी कवीची नसते त्याला! आपल्याला भेटायचंय हे ठरवावं लागेल लवकर मनातलं, कुशीवर झोपून सत्याचा प्रयोग स्वप्नात हसणं मर्त्य एक रात्रीचं स्मशान कार्य वाटेवरचं एकट्याने बसणं दु:सह्य होतं. तुझ्या बोलावण्याचा आवाज येईल बघ, तुझ्या घराबाहेरच बसलोय पावसाची आठवण परत सतत येते मातीचं काय काय असते नि तो, काय काय घडवून जातो. शब्दांना अहंकार जिभेनं सांगितला नसता तर...! उम्मिदिला काही अर्थ असता ना!!!

कारण

तू येतेस / येतोस पण रुजत नाहीस आमच्यात. पाणावलेले डोळे आमचे आतल्या आतही वाहत असतात. तुझं येण्याचं पण न थांबण्याचं कारण पिंजत बसतो, नि आम्हीच पिसं पिसं होऊन जातो. पुन्हा सावरत नव्या उभारीनं, ... आणि नकळत उद्ध्वस्त होण्याचं कारण पुन्हा आमचा पाठलाग करू लागतं. इथे मात्र बुध्दाने सांगितलेली 'कारण' मीमांसा कामी येत नाही. आम्ही तुझा पाठलाग करण्यात काय शिल्लक ठेवलंय ह्याचा हिशोब पण पुसत नाही. कदाचित आमचं स्वप्न उंची असेल! तू येणार नाहीस? कि थांबणार नाहीस? ह्या उत्तराचं नाही तर प्रश्नपत्रिकेचा अभ्यास चोख असतो आमचा. ह्या खेपेससुद्धा, पुन्हा तुझ्या येण्याची, वाट पाहण्याची तयारी सुरु करतोय हळू हळू, हळू हळू बघ तुही जमलं तर रुज आमच्यात.

भंगून स्वप्ने

भंगून स्वप्ने मोडली शांती उशाशी... उदासी जाणावी काय उरली आस अपेक्षाभंगी. उत्तरास दाखले कितीक निरखावे कुणी संदर्भी घोळ होतो उमजतो तू काय ? रोमियोचा खेळ केला प्यादेच राजे होते नगरास आटपाट शापित दार होते आतून कळ हि खोटी न लागते जिव्हारी उच्चारी कितीदा, अरेरे ना भावनेस घोर नजरेस लावा तोंड शब्दात कळू दे मज उघडझाप करती म्हणजे मारावे कि पुरावे ?

कुठं चुकतंय...?

किनारा आणि लाट  असेलच तळव्यांना स्पर्शुन तेव्हा सारं काही अथांग असतं मावळतीला न्याहाळून परतशील तेव्हा मागे अंधारात समुद्र... विरह भोगत असेल तसं नसेल तर तेच अथांगपण किनार्यावर सोडून मुक्तपणाचं असणं मीही सहज विसरतो. सांग, काय नी कुठं चुकतंय...?