Posts

Showing posts from December, 2017

ज्यांचं कुणीच नसते

उसळत जाणाऱ्या रक्ताला हिमोग्लोबिन आठवलं, आणि थोडा निवांत झाला इथेच तुझी आठवण दाटते हा सुद्धा एक हृदय विकार! खिसा रिकामा असला तरी प्रेम भरपूर करा असं सांगणाऱ्या भूमीत तू सोडून गेलीस, तेव्हा आधार कार्डही होतं माझं. आई वडिलांना वृद्धाश्रमचा रस्ता दाखवून ठेवलेला... पण मग तेही नाही गेले मित्र सारे पुण्याचे, पुणेरी पाट्यांनीच झोडायचे मूळचे तिथले नव्हते तरी. पैसा सर्वस्व आहे हे तुझं सांगणं पटलं होतं मला पण त्यासाठी कुणाला सोडून जावं लागत नाही हे कोण म्हणालं ते आठवत नाही, पण तू नसशील इतकं नक्की. असहिष्णुता प्रेमात असते? हे नेमकं कुणाला विचारु मी धर्माचा संबंध नसला तरी जातीशी लावतातच लोकं हे निमित्त झालं राजकारणाचं वेगळं झाल्याची सुद्धा पार्टी देणाऱ्या देशात तू न सांगता गेलीस. इतकंच काय ते दुःख मी माझं, सेलिब्रेट करतोय आणि फुंकर घालणारं कुणी आजू बाजूला नसताना थंडी सुरू झाली. ज्यांचं कुणीच नसते ते सुद्धा लगेच नाही मरत...!