Posts

Showing posts from March, 2014

कण

मी…, एक कण पृथ्वीच्या आकाराहून मोठा मुंगीच्या पावलांखाली मावणारा जराशा धक्यानेही सर्व नाश करणारा हलक्याशा स्पर्शानेही मातीमोल होणारा मार्गात येणारं सर्व काही तुडवत जाणारा कुणाच्या मार्गात आलो, तर रक्तबंबाळ होणारा नदीचा प्रवाहसुध्दा क्षणात बुजवणारा तिच्या गाळातही कायमचा रुतणारा कुणाचंही डोकं ठेचणारा कुणाच्याही हृदयात सामावणारा वादळ होऊन उध्वस्त करणारा धुळीत राहून संथ वाहणारा कुणाच्यातरी भविष्यावर घाला घालणारा कुणाचातरी भूतकाळ लपवून बसणारा… तू सुध्दा मला कसंही वागावं फक्त एवढच लक्षात ठेव दोष माझा कधीच नसणार! तू भिरकावून दे मला दगड समजून लांब किंवा शेंदूर फासून मला तुला मांडता येईल पूजा मी जीव असून निर्जीव, पायांखाली तुझ्या तू सजीव आहेस म्हणून सांभाळशील मला… मी एक कण, तू सांभाळशील म्हणून कुठेही हरवणारा कशातही सुखावणारा…!