Posts

Showing posts from September, 2017

माहितीच्या अधिकारात

प्रेमाचा... नको उल्लेख आभाळ निरखत बसतो, थेंब प्रेमाचा पडूनसुद्धा कसा रुजत नाही मी? उत्तरार्धात उत्खनन, नि सापडलं मन नाही पटत. लहर एक उध्वस्त करू शकते शहर मी मर्त्य..., हे मात्र पटेल क्षणार्धात. माहितीच्या अधिकारात, ती सांगेल खरं... कशासाठी होता तो कहर? विकलं गेलंय जिथे सारंच तिथं... उत्तर खरेदी करतोय एक भणंग.

कलुषित पाणी

ज्यात काही अर्थ असेल असं सांग देहबोली नि जीभ बदलत राहते सूर्य उगवला, सूर्य मावळला... घरातून निघ आणि परत घरी पाहू नकोस तू दिनवण्या नजरेने अशाने गरिबी कमी होत नसते आमची जवाबदारी खांदे शोधते 'लाचारी'वर P.hd करशील का! आगीने शिकवली जगण्याची चव संहाराची ठिणगी तू शोधली कुठे? पाण्याचा तुही न मीही पाण्याचा हे कलुषित पाणी प्यावं कुणी? मी एकदम साधा सरळ माणूस लोकांनी लोकांचं काय ते पहावं.

वेड्यांच्याच देशात राहिलास तू

वेड्यांच्याच देशात राहिलास तू निघायचं म्हणून निघालास आधुनिक जगात राहूनही पोहोचायचं कुठे हे तू ठरवू नाही शकलास! शाळेत एकाच बाकावर वा मागे पुढे बसून यथेच्छ मार खाऊन जमलं तेवढा अभ्यास करून जगण्याची किमान आशा पल्लवित ठेऊ शकलो इथवर समाधान. पुढे सर्व एक साची जगणं... बुद्धीच्या कुवतीनुसार वा जातीनुसार परंपरागत... बदल कशात झाला हे मात्र खूप साऱ्या घटना आठवल्यावर ... 'वय' ह्या शब्दापाशी येऊन थांबतो अकलेचे तारे तोडण्यात अर्धमग्न मनाचं पूर्ण योगदान जमेची बाजू धरत अल्पसंतुष्टी लादतो आमच्या पुढच्या पिढीवर रिकामा वेळ...? वाचन, मंथन, मनन... किंवा परवा परवाचं शिक्षण बुद्धी देऊन गेल्याचं दाखव कृतीत उतरवून...! जंगलात नाही राहत आपण ह्याचं किमान भान ठेव नि आपण काहीच बदलू शकत नाही तर निदान उद्ध्वस्त करण्याचा विचारही डोकावू देऊ नको... मेंदू फार मोठी चीज आहे समजायचं वय सरलंय, आणि मानेवर मिरवून फिरलं तरी... वेड्यांच्याच देशात राहिलास तू... मित्रा...!!!