Posts

Showing posts from March, 2013

फरक

एक नशीबवान दगड रस्त्यात आडवा पडून शेन्दराने माखुन सुखेनैव जगायचा आणि माझ्यासारखा तू उगीचच गफलत करून घ्यायचा दगडात अन देवात का कुणास ठाऊक ? अजूनही तुला फरक कळलेला नाही देवा - दगडाचा…? ऐक पुन्हा सांगतो, 'दगड देव नसतात देव दगडाचेच असतात !'

हसण्याच्या लकेरी

हजारो शरीरांच्या बरगड्यांचे तुकडे वाळू म्हणून पायांखाली मऊ लागतात तीन - चार कवट्यांची एकत्रित चौकट त्यावर बसल्यावर भन्नाट कल्पना स्फुरतात ! स्वरयंत्र गळालेले एकत्रित जमून वाचवा म्हणतात किंवा वाहवा म्हणतात, कुणाच्या गळ्यावर तलवार चालली की मुक्यांच्या घोषणांनी चळवळी जागवतात मुन्ड्क्यांचे गोळे तोफेतून उसळतात बोटांची हाडे बंदुकीतून बरसतात बंडखोरीचे रक्त अस्वस्थ धमन्यांत अस्वस्थ समाजात मनसोक्त सजतात अव्हेरतात खास, विसरतात भास स्वतःच्याच सावल्यांचा अंधार आसपास द्वेषाचा गंध मुरलेल्या मातीतून देशांच्या सीमांचा गायब प्रवास ! भग्न मुर्त्यांचा देह सांगतो, 'सारंच अंगं दुखतंय दगडी शिल्पांत' शरीरांच्या फौजा तालिबानी रंगतात अन हसण्याच्या लकेरी आसमंती उरतात…!

न्यायालय

त्यांना फिरून यायचं नसते माघारी उलट, जिथे ते सुटलंय ते आठवतही नसतं आठवलं तरी ते नको असल्याच्या खुणा चेहऱ्यावर तू 'नाही' म्हणालीस तरी जाणवतात मला खोलात मन फिरून येतं, अन ती वेळ आठवून कुणाला दोष द्यावा ह्याचा पंचनामा करतं… तर सारेच दोषी आढळतात ? आणि जिथे सारेच दोषी असतात त्याला न्यायालय नाही म्हणत…! तारखेचं महत्व तेव्हा पटू लागतं जेवढ्या त्या जास्त, तेवढी आठवण धुसर झाल्याचं कारण आयतं सापडतं…, केव्हाही काढता पाय घेता येतो. हां, तसं म्हणायला रात्री झोपण्यापूर्वी एकवार तरी आठवत असेल की पुन्हा असे होणे नाही तो विचार आणि खोलवर रुजू लागतो दोषी न्यायालयात फाशीची शिक्षा निश्चित केली जाते…! - २८-२-२०१३