Posts

कारण

तू येतेस / येतोस पण रुजत नाहीस आमच्यात. पाणावलेले डोळे आमचे आतल्या आतही वाहत असतात. तुझं येण्याचं पण न थांबण्याचं कारण पिंजत बसतो, नि आम्हीच पिसं पिसं होऊन जातो. पुन्हा सावरत नव्या उभारीनं, ... आणि नकळत उद्ध्वस्त होण्याचं कारण पुन्हा आमचा पाठलाग करू लागतं. इथे मात्र बुध्दाने सांगितलेली 'कारण' मीमांसा कामी येत नाही. आम्ही तुझा पाठलाग करण्यात काय शिल्लक ठेवलंय ह्याचा हिशोब पण पुसत नाही. कदाचित आमचं स्वप्न उंची असेल! तू येणार नाहीस? कि थांबणार नाहीस? ह्या उत्तराचं नाही तर प्रश्नपत्रिकेचा अभ्यास चोख असतो आमचा. ह्या खेपेससुद्धा, पुन्हा तुझ्या येण्याची, वाट पाहण्याची तयारी सुरु करतोय हळू हळू, हळू हळू बघ तुही जमलं तर रुज आमच्यात.

भंगून स्वप्ने

भंगून स्वप्ने मोडली शांती उशाशी... उदासी जाणावी काय उरली आस अपेक्षाभंगी. उत्तरास दाखले कितीक निरखावे कुणी संदर्भी घोळ होतो उमजतो तू काय ? रोमियोचा खेळ केला प्यादेच राजे होते नगरास आटपाट शापित दार होते आतून कळ हि खोटी न लागते जिव्हारी उच्चारी कितीदा, अरेरे ना भावनेस घोर नजरेस लावा तोंड शब्दात कळू दे मज उघडझाप करती म्हणजे मारावे कि पुरावे ?

कुठं चुकतंय...?

किनारा आणि लाट  असेलच तळव्यांना स्पर्शुन तेव्हा सारं काही अथांग असतं मावळतीला न्याहाळून परतशील तेव्हा मागे अंधारात समुद्र... विरह भोगत असेल तसं नसेल तर तेच अथांगपण किनार्यावर सोडून मुक्तपणाचं असणं मीही सहज विसरतो. सांग, काय नी कुठं चुकतंय...?

तुला कळतंय

असाही तोटा नाही अाठवणींचा माझ्याकडे पाऊस कधीही नी मोरही वेळी अवेळी नाचतात मराठी कळतंय तुला, असं मानते मी प्रेमाची एकच एक भाषा नसते म्हणून तोफेचा गोळाही बाजुला पडो येऊन..., मरो तो. नाही वाटत भीती. समुद्र खवळतो पोट भरूनही, ह्यात काहीतरी रहस्य आहे! आरशात समोरची 'मी' हसते तरीही हरवते ते स्मीत शोधत... कि हरवतेय मी कुणास...? तुला कळतंय..., हे मात्र उमगत नाहीयं मला? सांगायलाच हवं का तुला... देखावेही आजकाल जमू लागलेयत मला!

उगवल्याचं दु:ख

उगवल्याचं दु:ख सूर्यालाही असू शकतं अंधार पसरवणार्यांचं 'ते' जग न्याहाळल्यावर कोपरा न् कोपरा मी नाही उजळवू शकत लपण्यासाठी जग, सांग... कसं कमी पडतं? शुर तुझा तुच! जिंकते तुला कोण? कवट्यांच्या कुंड्या, असा वाटेत पेरत चालतोस! प्रेमच जर नसतं, धरणी फिरली असती? फिरलीत किती माथी, हे प्रेमालापण कळतं इतकी अाग अंगी, असा शांत मी अनंत ठीणगी भस्म करते, असा धर्म तुझा कोण?

रूप

अस्वस्थता, दारूण पराभवासारखी... विलक्षण खोलात गहीरे विवर... मोक्ष...? नसलेला माझा तरीही, भोगतो...मला...! पेरलेलं ऊगवेल असा तर्क चोख. उजाडत गेलेलं... सर्वस्व शोध! आरशात धुसर प्रतिमा! ...दिसतात... खरंच? मोकळं जगण्याचं आकाश बस..., बालपण शोधत... पुटं वाढवतात... चेहरा शोभा? माझं गणित... सोडवतं कोण? उद्याही जन्मेल, पण, ऊगीच नाही... रूप नवंच... अस्वस्थतेचं...

शास्त्र

मी ठीकाण हलवतो दर दोन दिवसांनी काळ नि स्थळ सुद्धा  एकसारखे राहत नाही म्हणत. ब्लड प्रेषरचे ठोके, तसंच अंदाज चुकण्यासाठी बांधलेले... वरून सोबत असणारे सारेच, हृदयरोगतज्ञ बाहेरूनच फुंकर घालतात, जीवात, जमेल तसं ऐकेक प्रक्रीया पार पडत जाते... शरीराचं वय तोवर कित्येक वर्ष पुढे निसटलेलं आजची घालमेल संपवून, ऊद्याचं नवं त्रांगडं गर्भगळित शरीरावर न लादून सांगणार कुणाला? पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळंच इतकं त्रासदायक करून ठेवण्यामागचं शास्त्र तूच मागितलस ना तुझ्या देवाला!