Posts

उगवल्याचं दु:ख

उगवल्याचं दु:ख सूर्यालाही असू शकतं अंधार पसरवणार्यांचं 'ते' जग न्याहाळल्यावर कोपरा न् कोपरा मी नाही उजळवू शकत लपण्यासाठी जग, सांग... कसं कमी पडतं? शुर तुझा तुच! जिंकते तुला कोण? कवट्यांच्या कुंड्या, असा वाटेत पेरत चालतोस! प्रेमच जर नसतं, धरणी फिरली असती? फिरलीत किती माथी, हे प्रेमालापण कळतं इतकी अाग अंगी, असा शांत मी अनंत ठीणगी भस्म करते, असा धर्म तुझा कोण?

रूप

अस्वस्थता, दारूण पराभवासारखी... विलक्षण खोलात गहीरे विवर... मोक्ष...? नसलेला माझा तरीही, भोगतो...मला...! पेरलेलं ऊगवेल असा तर्क चोख. उजाडत गेलेलं... सर्वस्व शोध! आरशात धुसर प्रतिमा! ...दिसतात... खरंच? मोकळं जगण्याचं आकाश बस..., बालपण शोधत... पुटं वाढवतात... चेहरा शोभा? माझं गणित... सोडवतं कोण? उद्याही जन्मेल, पण, ऊगीच नाही... रूप नवंच... अस्वस्थतेचं...

शास्त्र

मी ठीकाण हलवतो दर दोन दिवसांनी काळ नि स्थळ सुद्धा  एकसारखे राहत नाही म्हणत. ब्लड प्रेषरचे ठोके, तसंच अंदाज चुकण्यासाठी बांधलेले... वरून सोबत असणारे सारेच, हृदयरोगतज्ञ बाहेरूनच फुंकर घालतात, जीवात, जमेल तसं ऐकेक प्रक्रीया पार पडत जाते... शरीराचं वय तोवर कित्येक वर्ष पुढे निसटलेलं आजची घालमेल संपवून, ऊद्याचं नवं त्रांगडं गर्भगळित शरीरावर न लादून सांगणार कुणाला? पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळंच इतकं त्रासदायक करून ठेवण्यामागचं शास्त्र तूच मागितलस ना तुझ्या देवाला!

दगड सम्राट

मला विखुरता येत नाही स्वतःला रस्त्यांवरच्या धुळीसारखं, दगडासारखा वाटेत पडून हजारो पावलांना जखमा देत रक्ताचा टिळा माथी सजवून त्या लाथांचा मार खात आहे. सवय अंगवळणी पडलीय सवाल तसाच दारात उभा निर्लज्जपणाही निर्ढावून सुस्त लाजत नाही देहपण आता माती होऊन विखुरेपर्यंत का असेच आशीर्वाद घेत राहू कि उठून एक क्षणासाठी रणभूमीचा 'सम्राट' होऊ!

गर्दी

कधीच विचार नव्हता केला कोण सोबत आहे माझ्या, कोण माझ्या विरोधात…! त्या काफिल्याला आपलं मानून त्यात सामावून गेल्यावर तिथल्या गर्दीने अचानकच बाह्यांगावर एकही जखम न करता हृदय छातीतून विलग करत काळीजही तिथून खेचून काढलं हातांवरच्या रेषांनाही रस्ते समजून ती गर्दी मला तुडवत गेली… आणि गळण्यासाठी काहीच बाकी नसलेल्या त्या प्रचंड वृक्षाच्या सावलीत विसावा घेत मी विचार करतोय… 'परतणाऱ्या गर्दीसोबत पुन्हा मागे फिरावं'  

कण

मी…, एक कण पृथ्वीच्या आकाराहून मोठा मुंगीच्या पावलांखाली मावणारा जराशा धक्यानेही सर्व नाश करणारा हलक्याशा स्पर्शानेही मातीमोल होणारा मार्गात येणारं सर्व काही तुडवत जाणारा कुणाच्या मार्गात आलो, तर रक्तबंबाळ होणारा नदीचा प्रवाहसुध्दा क्षणात बुजवणारा तिच्या गाळातही कायमचा रुतणारा कुणाचंही डोकं ठेचणारा कुणाच्याही हृदयात सामावणारा वादळ होऊन उध्वस्त करणारा धुळीत राहून संथ वाहणारा कुणाच्यातरी भविष्यावर घाला घालणारा कुणाचातरी भूतकाळ लपवून बसणारा… तू सुध्दा मला कसंही वागावं फक्त एवढच लक्षात ठेव दोष माझा कधीच नसणार! तू भिरकावून दे मला दगड समजून लांब किंवा शेंदूर फासून मला तुला मांडता येईल पूजा मी जीव असून निर्जीव, पायांखाली तुझ्या तू सजीव आहेस म्हणून सांभाळशील मला… मी एक कण, तू सांभाळशील म्हणून कुठेही हरवणारा कशातही सुखावणारा…!

मन

आपल्या मनातला एक कोपरा प्रेममय असतो नेहमीच आपल्या जीवनासाठी कि मनातला कोपरा न कोपरा स्वप्नवत जपून ठेवतो येणाऱ्या सुखांसाठी कि एखाद्या कोपऱ्यात मन निपचित पडून राहतं सरल्या आयुष्यासाठी ?