Posts

अजून

एक बहर सरू दे अजून राहू दे अंतर तुझ्या माझ्यात आता गाठावी जवळीक कशाला स्पर्शावरही होईल आघात एक खंत करू दे अजून राहू दे दुरावा तुझ्या माझ्यात बंध संबंध असंबंध आता कशास गुंफावे हातात हात एक थेंब वाहू दे अजून राहू दे गफलत तुझ्या माझ्यात आठवून विसरलो आठवणी सगळ्या तुही पुरावे जाळून टाक एक सुर्य जळू दे अजून राहू दे अंधार तुझ्या माझ्यात माझ्या सावलीत अधिक असतो तुझ्या अंगाचा अंधार…

रामा तुझ्या नशिबी । पुन्हा वनवास ।।

ते सारेच रामभक्त । असे देशभर रक्त । वाहते तरी कितीदा । राम मंदिरासाठी ।। कुणी चेतविली रथयात्रा । ६ डिसेंबर रंगला । रक्तोत्सव ऋतु बहरला । कोण सुडापायी ।। न वाहिला थेंब । जो होता लालकृष्ण । ते सारे कृष्ण कृत्य । फक्त निष्पापांसाठी ।। कापुनिया कान - नाक । ऐकू येईना विव्हळणं । उमजेना रक्त दर्प । राम - शुर्पणखा ।। खंजीर पाठीत मारला । कसा विश्वास कुणाचा । रामा, तुझाच कित्ता । बालिचा वध ।। जगण्याची इच्छा फार । म्हणुनी हाती तलवार । उभा ठाकला समोर । पैगंबर धर्म ।। किती ठेवावा हिशोब । किती विखुरली घरं । किती धडावेगळी शीरं । साऱ्या देशभर ।। १२ मार्च उजाडला । १३ स्फोटांनी बिथरला । जीव घेणा खेळ पुन्हा । अयोध्येचा सूड ।। त्या उजाड जागी । प्रश्न अजूनही बाकी । नाही मंदिराची खुण । पाडूनही मस्जिद ।। येता निवडणुकीचा काळ । पुन्हा 'होणारं, होणारं' । मंदिराचा जुना हार । नव्या सत्तेसाठी ।। परवा जाळला डबा । किती विव्हळला गळा । अन देह उरला । राखे जैसा ।। जाळूनी अठरा पुरुषं । संगे स्त्रिया पंचवीस । कोवळी पंधरा बालकं । सारे कारसेवक ।। तोच खेळ पुन्हा । पुन्हा तोच खेळ ...

हृदयास छंद जळण्याचा

क्षणिक सहवास… …कुणाचा निरागस उपहास …विरहाचा अधांतरी आधार…  …अंधाराचा उन्माद तुलाही… …दुरावायचा जपलेला… …गंध फुलांचा उरलेला… …बंध गुंतण्याचा रंगलेला… …रंग जखमांचा शमलेला… …साथ जन्माचा पायात… …चाळ प्रेमाचा बेधुंद… …स्पर्श काफिराचा ओठांत… शब्द… प्रियेचा कैफास… आस… फितुराचा हृदयास… छंद… जळण्याचा!

मनाची सुधारीत आवृत्ती

सुरुंग वाटेत पेरून रोज घरी परततो संकटाची पावलेही जड असतात…, ऐकल्यापासून घर कधीतरी छावणी, कधी शत्रूही सोबत राहतात. सुखा दुःखाची चढाई एकमेकावर केव्हाही शांतीचा आग्रह धरत, माझाच बळी देत मी दोघांचंही अस्तित्व नाकारतो…, कारणमीमांसा करतो तर हजारो वर्षांपूर्वीचं कुणाचं हास्य कानी पडतं…! माझंच सारं जीणं नादुरुस्त असेलसं समजून घराबाहेर पडलं तर 'संध्याकाळी लवकर घरी याल' म्हणत, माझ्या सावलीत आणि एक स्त्री देह वावरतो परिस्थितीची सदैव जाण करून देत ती मोकळं करते मला… तिचाही संसार ती माझ्यातच पाहते! चेहेऱ्याच्या सर्व स्नायुंना आनंद विकाराचा झटका देत माझं खोटं हास्य तिच्या गळी उतरवत, पाय उतार होतो… 'दिलको बेहेलाने के लिये' वगैरे वगैरे आठवत गालिब सारखे दोन - चार जणं प्रवासात सोबत करतात. अवैध संपत्ती जप्त करतात अगदी तसंच या प्रश्नांचही होऊ शकते का? हा क्रांतिकारी विचार लोकसभेत शुन्य प्रश्नोत्तर काळात चर्चिला जाऊ शकतो का? इतकं मन काव्यात्मक होऊन जाते… अर्थात ३६ रुपयांत गरिबी संपवता येऊ शकते हाही आधार असतो त्या विचारला. कुत्र्याने अंग झटकाव तसं स्वप्नही झटकते मला ...

काय वेगळं काही…

आवरून घे स्वतःला सकाळ होण्यापूर्वी कुठेतरी मोकळं होऊन उन, वारा, पाऊस काहीतरी नाहीच तर रोजची खरडेघाशी… आणि जीवन म्हणजे काय वेगळं काही? हातात उरलेला मळ, तोंडात फसलेला गळ! इथून तिथून माणसं आरपार फिरत जातात मन तर तसही अदृश्य, वरून जबरदस्ती नसतेच की समजून घे मला व्यवहार तरीही होतोच खरेदी - विक्रीचा आणि जग-रहाटी म्हणजे काय वेगळं काही? विरह…, न मिळालेल्या सर्व इच्छांचा 'तू जवळ नसावी' ही पण असेल, 'अडचण' पण काही चीज असावी की इथे सांगू शकत नाही अशी सुद्धा…! तरीही असणं - नसणं म्हणजे काय वेगळं काही? ठरलाच तर मोह, उरलाच तर डोह…!

अवती भोवती माझ्या

तुझ्या हसण्यात कोडे असते नेहमीच तु सांगशील…, पण खोटं, हे ही मी जाणतो अवती भोवती माझ्या, तु रुतलेली असतेस केव्हाही पण तुला नको असलेल्या आणि हव्या असलेल्या गोष्टी तु एकाच पानावर लिहितेस… गोंधळ दोघांचाही होतो…! 'मला तु हवीय', मी अर्थ लावतो 'तु नकोस मला', तु अर्थ लावते... अवती भोवती माझ्या, तु रुतलेली असतेस तेव्हाही…!

नाईलाज असाही असतो !

'मी कवेत आसमंत घेतलाय' तिला हे ठाऊक होतं, मी खोटं बोलतोय तरीही तिचा स्वप्नपंखी मनपाखरू माझा आसमंत चिरत होता मला माहित होतं, स्वप्न ऊंची होतं…! नाईलाज असाही असतो ! कालच जेलमधून सुटलो खोटं बोलण्याचा आरोप होता खरं बोलण्याची सवय कधीच मोडलेली कारण कुणाचंही मन मोडणं पुन्हा गुन्हा होतो. नाईलाज असाही असतो ! परवा रात्री रस्ता क्रमांक ४ खोदला नवीन गेस पाईप लाईन टाकली रस्ता पुन्हा डांबरने झाकला कंत्राटदार बदलला, काम बदललं गेस पाईप लाईन मधूनच इलेक्ट्रिक लाईन द्यायचं ठरलेलं. नाईलाज असाही असतो ! कुठल्यातरी समारंभात भयानक आग लागलेली कळलं, कुणातरी मंत्रीचं भाषण होतं विषय होता, 'भारत महासत्ता होणार!' प्रश्नच नव्हता, ३२५ जणं पूर्णपणे जळून गेलेली ओळख पटवणं केवळ अशक्य आणि डिएनए रिपोर्ट कुणाचाही नव्हता! सामूहिक अन्त्यसंस्काराचं उत्तर तयार होतं. महासत्ता होण्यासाठी हजारो हात तत्पर होते. नाईलाज असाही असतो ! अजूनही तू तुलाच जगवतो मी मलाच जगवतो मी श्वास घेऊन सोडलेल्या उच्छवासावर तू अवलंबून असतो. नाईलाज असाही असतो ! शब्दात सापडलेल्या अर्थाच्या बाह...