नाईलाज असाही असतो !

'मी कवेत आसमंत घेतलाय'
तिला हे ठाऊक होतं,
मी खोटं बोलतोय
तरीही तिचा स्वप्नपंखी मनपाखरू
माझा आसमंत चिरत होता
मला माहित होतं,
स्वप्न ऊंची होतं…!

नाईलाज असाही असतो !

कालच जेलमधून सुटलो
खोटं बोलण्याचा आरोप होता
खरं बोलण्याची सवय कधीच मोडलेली
कारण कुणाचंही मन मोडणं
पुन्हा गुन्हा होतो.

नाईलाज असाही असतो !

परवा रात्री रस्ता क्रमांक ४ खोदला
नवीन गेस पाईप लाईन टाकली
रस्ता पुन्हा डांबरने झाकला
कंत्राटदार बदलला, काम बदललं
गेस पाईप लाईन मधूनच
इलेक्ट्रिक लाईन द्यायचं ठरलेलं.

नाईलाज असाही असतो !

कुठल्यातरी समारंभात
भयानक आग लागलेली
कळलं, कुणातरी मंत्रीचं भाषण होतं
विषय होता, 'भारत महासत्ता होणार!'
प्रश्नच नव्हता,
३२५ जणं पूर्णपणे जळून गेलेली
ओळख पटवणं केवळ अशक्य
आणि डिएनए रिपोर्ट कुणाचाही नव्हता!
सामूहिक अन्त्यसंस्काराचं उत्तर तयार होतं.
महासत्ता होण्यासाठी
हजारो हात तत्पर होते.

नाईलाज असाही असतो !

अजूनही तू तुलाच जगवतो
मी मलाच जगवतो
मी श्वास घेऊन सोडलेल्या उच्छवासावर
तू अवलंबून असतो.

नाईलाज असाही असतो !

शब्दात सापडलेल्या अर्थाच्या बाहेर
मी फिरून येतो तरीही, 
तु माझ्यासाठी एक कोडेच असतेस...!

नाईलाज असाही असतो !


मी खेड्यात राहतो.
तू शहरातून येतोस,
माझ्या घरी पाहुणा म्हणून
पाणी मात्र तुला बिस्लेरी लागते.
उन्हाळ्यातच तुझी गोची होते 
तेव्हा तू माझ्या घरची वीज 
कोणताही भेदभाव न बाळगता घेतोस 
शहरी दिवाळी साजरी करतोस…!
आणि मी तहान भागवण्यासाठी
तुझ्या बिस्लेरीला पाणी देणाऱ्या 
माझ्या गावच्या नदीतूनही
पाणी पिऊ शकत नाही…!

नाईलाज असाही असतो !

कायम प्रेम देत राहा
असा संदेश देणाऱ्या देशात
मी जन्म घेतो तेव्हा,
रस्त्यातून जाणार्या भावा-बहिणीला
अनोळखी लोकांच्या नजरा
'लफडं' असणार ह्याच नजरेने बघतात.

नाईलाज असाही असतो !

माझ्याच घरात
न ऐकणाऱ्या व्यक्ती वावरतात
आणि मला मात्र जग सुंदर करण्याची 
अनावर इच्छा असते!

नाईलाज असाही असतो !

बाजारात सट्टे लाऊन
हजारो घोटाळे करणं
सरकारला मान्य नसते
त्यांची पॉलिसी साधी, सोपी, सरळ असते
आम्ही हजारो योजना राबवतो
करोडोंचा मामला असतो
वरून 'सरकारी संरक्षण' असते
मग नव्याने आणि अनधिकृत गुंतवणूक कशाला?

नाईलाज असाही असतो !

एक कवी नुकताच भेटून गेला 
दुखावला होता…
शाल जोडीतल्या चार शिव्या देऊन गेला.
मला काव्य रचता येत नाही
कवितेत अकल्पित कल्पनांचा 
अविष्कार करता येत नाही.
वास्तव कठोर असते
लोकं वैतागलेली असतात
तुम्हाला करमणूक प्रधान लिहिता येत नाही 
कोणत्याही परिस्थितीत 
देखावा रंगवणं जमलंच पाहिजे
तो कवितेचा जीव असतो…
इत्यादी, इत्यादी, इत्यादी…,
अन तेव्हाच मला नवीन पुस्तकाची
अर्पण पत्रिका सुचते

'नाईलाज असाही असतो !'

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य