मनाची सुधारीत आवृत्ती

सुरुंग वाटेत पेरून रोज घरी परततो
संकटाची पावलेही जड असतात…, ऐकल्यापासून
घर कधीतरी छावणी, कधी शत्रूही सोबत राहतात.
सुखा दुःखाची चढाई एकमेकावर केव्हाही
शांतीचा आग्रह धरत, माझाच बळी देत मी
दोघांचंही अस्तित्व नाकारतो…, कारणमीमांसा करतो
तर हजारो वर्षांपूर्वीचं कुणाचं हास्य कानी पडतं…!

माझंच सारं जीणं नादुरुस्त असेलसं समजून
घराबाहेर पडलं तर 'संध्याकाळी लवकर घरी याल'
म्हणत, माझ्या सावलीत आणि एक स्त्री देह वावरतो
परिस्थितीची सदैव जाण करून देत ती मोकळं करते मला…
तिचाही संसार ती माझ्यातच पाहते!

चेहेऱ्याच्या सर्व स्नायुंना आनंद विकाराचा झटका देत
माझं खोटं हास्य तिच्या गळी उतरवत, पाय उतार होतो…
'दिलको बेहेलाने के लिये' वगैरे वगैरे आठवत
गालिब सारखे दोन - चार जणं प्रवासात सोबत करतात.
अवैध संपत्ती जप्त करतात अगदी तसंच
या प्रश्नांचही होऊ शकते का?
हा क्रांतिकारी विचार लोकसभेत शुन्य प्रश्नोत्तर काळात
चर्चिला जाऊ शकतो का? इतकं मन काव्यात्मक होऊन जाते…
अर्थात ३६ रुपयांत गरिबी संपवता येऊ शकते
हाही आधार असतो त्या विचारला.

कुत्र्याने अंग झटकाव तसं स्वप्नही झटकते मला
आज काल त्यांनाही वास्तववादाची भूरळ पडलीय
मग आठवते, माझं तुझ्यावरही तर प्रेम आहे, अगदी वास्तवदर्शी
सावल्यांच्या खेळांना ठिकाणांचं बंधन असतं - नसतं
म्हणून तर स्वप्न तुझ्यासाठीही बघून ठेवतो, दोन - चार
व्यक्ती बदलली तरी सावलीची भूमिका चोख असायलाच हवी.

तसाही कुठल्या एकाच मंदिरात तू तरी रोज कुठे जातोस ?

अशी सगळीच सर मिसळ आहे जिवनात
आता हेच पहा ना,
अवती भोवती किती लहरी वावरतात माझ्या
इंटरनेट, रेडीओ, मोबाईल, टेलि-व्हिजन इत्यादी
आणि माझ्या शरीरात भविष्यातलं 'आधार' कार्ड लावशील
तर माझ्यातच सगळं गवसेल तुला
तुझ्या 'फेसबुक' चं रिस्क बुक झालेलं आवडेल तुला?
असं झालंच तर फेसबुक आणि पर्यायाने अंतरंग
दोन्ही स्वच्छ आणि सफेद होतील,
चित्रकला, शब्दकला असं काहीतरी तुला जमायला हवं तोपर्यन्त…

तुझ्या स्वातंत्र्यावर घाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य
वगैरे बरेच काही गोंधळ उडतील तुझ्यात…, ते राहू दे बाजूला
आपण आपलंच शोषण कित्येकदा करतो, कळत - नकळत
त्याबद्दल आपण आधी बोलू…
सुरुवात आपल्यानेच करायला हवी ना?

पावसाचे दोन थेंब भांडतच अंगावर पडतात
मला बुडवून टाकावं इतका छोटा वाटतो मी त्यांना
त्यांच्यावर कविताही लिहिता येते मला…, जसं…
'थेंबा तुझ्या येण्या - जाण्याने फरक पडतोय मला,
तू आलास तर जमिनीत सोनं नाही तर माझं जमिनीत होणं'
बस्स, इतकच सांगायचंय मला थेंबांबद्दल
कुठल्याही गोष्टीच्या इतकंही खोलात जायचं नाही की
'Boomerang' शब्द का जन्मला ह्याचं उत्तर सापडावं.

प्रगल्भतेचा अभाव तुला आणखीनच जाणवेल माझ्यात
तुला हव्या असलेल्या क्षणिक सुखात किंवा
क्षणभंगूरतेच्या विळख्यात मी अडकलो नसतो
ही तुझी नसण्याची खंत, माझ्या असण्याचा प्रांत असतो
बुद्धा सारखं कुठे सर्वांना पार होता येतं ?
म्हणून बरंच काही मी तुझ्यातलच उचलून घेतो, तुझ्या नकळत
आणि सारं काही निरखून
मी माझी जाणिव रितसर समजावून घेत
मनाची सुधारीत आवृत्ती तुझ्यापुढे मांडतो
तर, तेव्हाही तू अडकलेला असतोस…!!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य