रामा तुझ्या नशिबी । पुन्हा वनवास ।।

ते सारेच रामभक्त । असे देशभर रक्त ।
वाहते तरी कितीदा । राम मंदिरासाठी ।।

कुणी चेतविली रथयात्रा । ६ डिसेंबर रंगला ।
रक्तोत्सव ऋतु बहरला । कोण सुडापायी ।।

न वाहिला थेंब । जो होता लालकृष्ण ।
ते सारे कृष्ण कृत्य । फक्त निष्पापांसाठी ।।

कापुनिया कान - नाक । ऐकू येईना विव्हळणं ।
उमजेना रक्त दर्प । राम - शुर्पणखा ।।

खंजीर पाठीत मारला । कसा विश्वास कुणाचा ।
रामा, तुझाच कित्ता । बालिचा वध ।।

जगण्याची इच्छा फार । म्हणुनी हाती तलवार ।
उभा ठाकला समोर । पैगंबर धर्म ।।

किती ठेवावा हिशोब । किती विखुरली घरं ।
किती धडावेगळी शीरं । साऱ्या देशभर ।।

१२ मार्च उजाडला । १३ स्फोटांनी बिथरला ।
जीव घेणा खेळ पुन्हा । अयोध्येचा सूड ।।

त्या उजाड जागी । प्रश्न अजूनही बाकी ।
नाही मंदिराची खुण । पाडूनही मस्जिद ।।

येता निवडणुकीचा काळ । पुन्हा 'होणारं, होणारं' ।
मंदिराचा जुना हार । नव्या सत्तेसाठी ।।

परवा जाळला डबा । किती विव्हळला गळा ।
अन देह उरला । राखे जैसा ।।

जाळूनी अठरा पुरुषं । संगे स्त्रिया पंचवीस ।
कोवळी पंधरा बालकं । सारे कारसेवक ।।

तोच खेळ पुन्हा । पुन्हा तोच खेळ ।
खेळ पुन्हा तोच । रामा तुझ्याचसाठी ।।

जरी बांधले मंदिर । न बांधले तरीही ।
रामा  तुझ्या नशिबी । पुन्हा वनवास ।।


Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य