Posts

अवती भोवती माझ्या

तुझ्या हसण्यात कोडे असते नेहमीच तु सांगशील…, पण खोटं, हे ही मी जाणतो अवती भोवती माझ्या, तु रुतलेली असतेस केव्हाही पण तुला नको असलेल्या आणि हव्या असलेल्या गोष्टी तु एकाच पानावर लिहितेस… गोंधळ दोघांचाही होतो…! 'मला तु हवीय', मी अर्थ लावतो 'तु नकोस मला', तु अर्थ लावते... अवती भोवती माझ्या, तु रुतलेली असतेस तेव्हाही…!

नाईलाज असाही असतो !

'मी कवेत आसमंत घेतलाय' तिला हे ठाऊक होतं, मी खोटं बोलतोय तरीही तिचा स्वप्नपंखी मनपाखरू माझा आसमंत चिरत होता मला माहित होतं, स्वप्न ऊंची होतं…! नाईलाज असाही असतो ! कालच जेलमधून सुटलो खोटं बोलण्याचा आरोप होता खरं बोलण्याची सवय कधीच मोडलेली कारण कुणाचंही मन मोडणं पुन्हा गुन्हा होतो. नाईलाज असाही असतो ! परवा रात्री रस्ता क्रमांक ४ खोदला नवीन गेस पाईप लाईन टाकली रस्ता पुन्हा डांबरने झाकला कंत्राटदार बदलला, काम बदललं गेस पाईप लाईन मधूनच इलेक्ट्रिक लाईन द्यायचं ठरलेलं. नाईलाज असाही असतो ! कुठल्यातरी समारंभात भयानक आग लागलेली कळलं, कुणातरी मंत्रीचं भाषण होतं विषय होता, 'भारत महासत्ता होणार!' प्रश्नच नव्हता, ३२५ जणं पूर्णपणे जळून गेलेली ओळख पटवणं केवळ अशक्य आणि डिएनए रिपोर्ट कुणाचाही नव्हता! सामूहिक अन्त्यसंस्काराचं उत्तर तयार होतं. महासत्ता होण्यासाठी हजारो हात तत्पर होते. नाईलाज असाही असतो ! अजूनही तू तुलाच जगवतो मी मलाच जगवतो मी श्वास घेऊन सोडलेल्या उच्छवासावर तू अवलंबून असतो. नाईलाज असाही असतो ! शब्दात सापडलेल्या अर्थाच्या बाह...

कात

तु सुद्धा शब्द खेळाचा एक डाव मांडलास तुझ्या ओठांवरचा प्रिय खेळ मी सुद्धा उपभोगला माझ्या जगण्याची रीत तुझे शब्द रोज बदलायचे अन रोज नवा अर्थ द्यायचे जीवनाला उगाच तुझे ओठ कधीच शब्दांत गुंतले नाही कि नाही सोडला मनाने शब्द गुंफण्याचा ध्यास मी एकसंध असा हजार शब्दांत वाटलो पण शरीर सोडत नाही तुझ्या शब्दांची कात!

मरणासन्न

मरणासन्न…, समाधीबंध नजर खोलात उतरलेला श्वास ठिणगीचा चटका जाणवेल इतकाच अखेरचा स्पर्श! नजर पटलांवरची गर्दी तशातही भावना चाळवते… एक दिर्घ सुस्कारा, श्वासालाही तिटकारा पुन्हा नाकावर परतायला हुंदक्यांची वाढती तीव्रता जाणवतं…, आता निघायला हवं ! आवरता घेत मोकाट मोह धीराने बांधतो अखेरचा दिलासा 'सगळेच परतणार आपल्याजवळ पुन्हा' मरणासन्न…!!!

फरक

एक नशीबवान दगड रस्त्यात आडवा पडून शेन्दराने माखुन सुखेनैव जगायचा आणि माझ्यासारखा तू उगीचच गफलत करून घ्यायचा दगडात अन देवात का कुणास ठाऊक ? अजूनही तुला फरक कळलेला नाही देवा - दगडाचा…? ऐक पुन्हा सांगतो, 'दगड देव नसतात देव दगडाचेच असतात !'

हसण्याच्या लकेरी

हजारो शरीरांच्या बरगड्यांचे तुकडे वाळू म्हणून पायांखाली मऊ लागतात तीन - चार कवट्यांची एकत्रित चौकट त्यावर बसल्यावर भन्नाट कल्पना स्फुरतात ! स्वरयंत्र गळालेले एकत्रित जमून वाचवा म्हणतात किंवा वाहवा म्हणतात, कुणाच्या गळ्यावर तलवार चालली की मुक्यांच्या घोषणांनी चळवळी जागवतात मुन्ड्क्यांचे गोळे तोफेतून उसळतात बोटांची हाडे बंदुकीतून बरसतात बंडखोरीचे रक्त अस्वस्थ धमन्यांत अस्वस्थ समाजात मनसोक्त सजतात अव्हेरतात खास, विसरतात भास स्वतःच्याच सावल्यांचा अंधार आसपास द्वेषाचा गंध मुरलेल्या मातीतून देशांच्या सीमांचा गायब प्रवास ! भग्न मुर्त्यांचा देह सांगतो, 'सारंच अंगं दुखतंय दगडी शिल्पांत' शरीरांच्या फौजा तालिबानी रंगतात अन हसण्याच्या लकेरी आसमंती उरतात…!

न्यायालय

त्यांना फिरून यायचं नसते माघारी उलट, जिथे ते सुटलंय ते आठवतही नसतं आठवलं तरी ते नको असल्याच्या खुणा चेहऱ्यावर तू 'नाही' म्हणालीस तरी जाणवतात मला खोलात मन फिरून येतं, अन ती वेळ आठवून कुणाला दोष द्यावा ह्याचा पंचनामा करतं… तर सारेच दोषी आढळतात ? आणि जिथे सारेच दोषी असतात त्याला न्यायालय नाही म्हणत…! तारखेचं महत्व तेव्हा पटू लागतं जेवढ्या त्या जास्त, तेवढी आठवण धुसर झाल्याचं कारण आयतं सापडतं…, केव्हाही काढता पाय घेता येतो. हां, तसं म्हणायला रात्री झोपण्यापूर्वी एकवार तरी आठवत असेल की पुन्हा असे होणे नाही तो विचार आणि खोलवर रुजू लागतो दोषी न्यायालयात फाशीची शिक्षा निश्चित केली जाते…! - २८-२-२०१३