हसण्याच्या लकेरी

हजारो शरीरांच्या बरगड्यांचे तुकडे
वाळू म्हणून पायांखाली मऊ लागतात
तीन - चार कवट्यांची एकत्रित चौकट
त्यावर बसल्यावर भन्नाट कल्पना स्फुरतात !

स्वरयंत्र गळालेले एकत्रित जमून
वाचवा म्हणतात किंवा वाहवा म्हणतात,
कुणाच्या गळ्यावर तलवार चालली की
मुक्यांच्या घोषणांनी चळवळी जागवतात

मुन्ड्क्यांचे गोळे तोफेतून उसळतात
बोटांची हाडे बंदुकीतून बरसतात
बंडखोरीचे रक्त अस्वस्थ धमन्यांत
अस्वस्थ समाजात मनसोक्त सजतात

अव्हेरतात खास, विसरतात भास
स्वतःच्याच सावल्यांचा अंधार आसपास
द्वेषाचा गंध मुरलेल्या मातीतून
देशांच्या सीमांचा गायब प्रवास !

भग्न मुर्त्यांचा देह सांगतो,
'सारंच अंगं दुखतंय दगडी शिल्पांत'
शरीरांच्या फौजा तालिबानी रंगतात
अन हसण्याच्या लकेरी आसमंती उरतात…!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य