Posts

कात

तु सुद्धा शब्द खेळाचा एक डाव मांडलास तुझ्या ओठांवरचा प्रिय खेळ मी सुद्धा उपभोगला माझ्या जगण्याची रीत तुझे शब्द रोज बदलायचे अन रोज नवा अर्थ द्यायचे जीवनाला उगाच तुझे ओठ कधीच शब्दांत गुंतले नाही कि नाही सोडला मनाने शब्द गुंफण्याचा ध्यास मी एकसंध असा हजार शब्दांत वाटलो पण शरीर सोडत नाही तुझ्या शब्दांची कात!

मरणासन्न

मरणासन्न…, समाधीबंध नजर खोलात उतरलेला श्वास ठिणगीचा चटका जाणवेल इतकाच अखेरचा स्पर्श! नजर पटलांवरची गर्दी तशातही भावना चाळवते… एक दिर्घ सुस्कारा, श्वासालाही तिटकारा पुन्हा नाकावर परतायला हुंदक्यांची वाढती तीव्रता जाणवतं…, आता निघायला हवं ! आवरता घेत मोकाट मोह धीराने बांधतो अखेरचा दिलासा 'सगळेच परतणार आपल्याजवळ पुन्हा' मरणासन्न…!!!

फरक

एक नशीबवान दगड रस्त्यात आडवा पडून शेन्दराने माखुन सुखेनैव जगायचा आणि माझ्यासारखा तू उगीचच गफलत करून घ्यायचा दगडात अन देवात का कुणास ठाऊक ? अजूनही तुला फरक कळलेला नाही देवा - दगडाचा…? ऐक पुन्हा सांगतो, 'दगड देव नसतात देव दगडाचेच असतात !'

हसण्याच्या लकेरी

हजारो शरीरांच्या बरगड्यांचे तुकडे वाळू म्हणून पायांखाली मऊ लागतात तीन - चार कवट्यांची एकत्रित चौकट त्यावर बसल्यावर भन्नाट कल्पना स्फुरतात ! स्वरयंत्र गळालेले एकत्रित जमून वाचवा म्हणतात किंवा वाहवा म्हणतात, कुणाच्या गळ्यावर तलवार चालली की मुक्यांच्या घोषणांनी चळवळी जागवतात मुन्ड्क्यांचे गोळे तोफेतून उसळतात बोटांची हाडे बंदुकीतून बरसतात बंडखोरीचे रक्त अस्वस्थ धमन्यांत अस्वस्थ समाजात मनसोक्त सजतात अव्हेरतात खास, विसरतात भास स्वतःच्याच सावल्यांचा अंधार आसपास द्वेषाचा गंध मुरलेल्या मातीतून देशांच्या सीमांचा गायब प्रवास ! भग्न मुर्त्यांचा देह सांगतो, 'सारंच अंगं दुखतंय दगडी शिल्पांत' शरीरांच्या फौजा तालिबानी रंगतात अन हसण्याच्या लकेरी आसमंती उरतात…!

न्यायालय

त्यांना फिरून यायचं नसते माघारी उलट, जिथे ते सुटलंय ते आठवतही नसतं आठवलं तरी ते नको असल्याच्या खुणा चेहऱ्यावर तू 'नाही' म्हणालीस तरी जाणवतात मला खोलात मन फिरून येतं, अन ती वेळ आठवून कुणाला दोष द्यावा ह्याचा पंचनामा करतं… तर सारेच दोषी आढळतात ? आणि जिथे सारेच दोषी असतात त्याला न्यायालय नाही म्हणत…! तारखेचं महत्व तेव्हा पटू लागतं जेवढ्या त्या जास्त, तेवढी आठवण धुसर झाल्याचं कारण आयतं सापडतं…, केव्हाही काढता पाय घेता येतो. हां, तसं म्हणायला रात्री झोपण्यापूर्वी एकवार तरी आठवत असेल की पुन्हा असे होणे नाही तो विचार आणि खोलवर रुजू लागतो दोषी न्यायालयात फाशीची शिक्षा निश्चित केली जाते…! - २८-२-२०१३ 

भीक

प्रेम त्याग मागतं, प्रेम बलिदान मागतं, प्रेम सहवास मागतं, प्रेम स्पर्श मागतं, प्रेम आठवण मागतं, प्रेम ... मागतं, हळू हळू प्रेम सगळंच मागत जातं... आणि मग कळतं, प्रेम भीकही मागतं ! फक्त पसरवत नाही हात कुणासमोर कारण ते कुणीही छाटून टाकेल ! म्हणून भावनेच्या आहारी हृदय बांधून प्रेम 'भावनिक भीक' मागतं !

नितळ, स्वच्छ मनाची माणसं

ओठांच्या कडेवर आणून शब्दातला अक्षर न अक्षर ढकलून द्यावा कुणाच्या कानी... कान तसाच निःस्तब्ध, कान ल्यालेल्या चेहेर्याचा भाव जणू जन्मापासूनच 'बहिरा' डोळ्यांचा रंग गंजल्यासारखा लाल सुजलेले गाल, जणू रागाने कुठल्याशा भावनांनी ओथंबलेला चेहेरा अगदी 'निरागस' नकोस वाटतो. शब्दांची हत्या केल्याचं  पातक मी मग मान्य करतो... अन 'सक्तमजुरी' लाभून तुरुंगात असल्यासारखा घरातल्या खिडकीच्या गजांमधून जाईल तिथवर नजर टाकत 'नितळ, स्वच्छ मनाची माणसं' शोधल्याची चूक म्हणून स्वप्नांचं दळण रोज दळतो... आता नितळ, स्वच्छ मनाची माणसं स्वप्नातच वावरतात...