Posts

परग्रहवासी

वातावरणाच्या बाहेर फेकीन म्हणतो तुला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जर कामी येणार नसेल झोपेतही कुस बदलून, उपद्व्यापी उसळतात जे वर गेलेत त्यांचं काही खरं नाही आता हात पाहून ज्योतिषाने घाम पुसला क्षणात मागच्या महिन्यात तोही, पडला होता घरात अरुंद गल्ली, अंधार घरात, माणसं फक्त सहा पाहुणा येता घरा, आम्हा सर्वांचा टपरीवर चहा संशयी नजर घेऊन वर फिरतात टेहळणी यान आईनं सांगितलं होतं, 'ही सोडून जाणार तुला' पाऊस, प्रेयसी, पेग..., ढगात, मिठीत, घशात सुखावेल कशात कोण? कुणी सांगत नाही आता!

उपदेश

जो पुढे गेला त्याला आपण जग मागे टाकल्याचा साक्षात्कार झाला नी तो मागे राहिलेल्या सोबत्यांना शहाणपणाचे उपदेश पाजू लागला मागे राहिलेला मित्र कमी पावलं... कमी सोबत... कमी शब्द... अशी काटकसर अमलात आणून पुढे गेलेल्या मित्राला इतकं पुढे जाऊ देतो की... मागे राहिलेला मित्र तुमचा प्रवास सुखकर व्हावा म्हणत आपल्या प्रवासाला निघतो... दुनिया छोटी नाही हा मोठा विचार डोक्यात मावत नाही नजरेस दिसत नाही जाणीव होत नाही पण... जो पुढे गेला त्याला आपण जग मागे टाकल्याचा इतका साक्षात्कार झाला जग त्याला मागे टाकू लागलं...!!!

मागे काय उरतय

एका रात्रीत लाखो लोकांच्या स्वप्नांचं गणित सुटेल ना सुटेल, माझा कच्चा विषय आहे तो किती दिवस आजवर झालेत, हे मोजू शकतो गुणांच्या गळतीला छिद्र हजार होती हातच्या वजाबकीला बोटं नव्हती मेंदूचा वापर ही तोवर भानगडच नव्हती मला मात्र तुला शब्दात पकडता येऊ लागलं लिहून ठेवा चोख, क्रम न त्याच्या रिती पाठ करून सवयीन जाईल सुद्धा भीती अर्थ समजून पुन्हा, गवसेल नवचं हाती कमी अधिक आलं गेलं, हिशोब ठेवतो कोण मोजून मापून जगतो, छोटं दिसते जग मागे काय उरतय अन् पुढे जातंय कोण?

आपण प्रेमात रहायलाच हवं...!

पावसाचे दोन थेम्ब अंगावर पडण्यापेक्षा 'ते दोन थेंब' घशाखाली गेले तर हवा तो देखावा उभा करू शकतात. पण ते अतृप्त राहील तरच छान तुझी आठवण इथेच सुरू नी इथच संपायला हवी थेंब अंगावर पडून भिजण्याचा आनंद दाटून आल्यावरच मिळेल... अव्यक्त मेंदूला इथेच आराम मिळतो सर्व अर्ध्यावरती सोडावं हे त्या शोकात्म नाटकासारखं वाटेल पण... आपण प्रेमात रहायलाच हवं...!

कागद तरंगतो पाण्यावर

नभीच्या अस्ताव्यस्त रेघांवर आरपार रेषा उमटतील येऊ तर दे दाटून थेंबांचा समुद्र आकाशी नसतं ते नवीन धावून आसरा शोधतो हिरवंगार काय काय होतं एकदा विचार स्वतःशी खिडकीच्या अलगद वरती गोल थेंबांचा झरा कागद तरंगतो पाण्यावर मला सांगितलंय कुणी? बोलायचंय का मातीबद्दल? पाऊस कवितेत वाचलं असशील अनुभव वेगळा होतो त्यांना जे गेलेत मातीखाली पहिलं प्रेम आठवून जातं तुला आठवेन मी वादळ उठुनही शांत सोबत चहा अन भजी

दर्द सारं पेल्यात

नजरेआड थांबून गेलेलं एक स्वप्न पाण्याचे सपकारे मारून अंधुकशी कल्पना नाही देत कुणाला काही सांगायचंय... मला काही ऐकायचंय हे मात्र माझ्यापुरतं खरं नाही सांगत पण मी कुणाला नाही विचारत कुणाला मला ओळखून घे अशी सरमिसळ होत जाते गर्दीतून आपली आर पार लक्ष देऊ नये कुणी कुणास इतकी गर्दी... पहाटेचे डोळे उघडतात अजून हा एक आशावाद उशा पाशीच सोडून स्वप्नाला निजत ठेवतो ते कोण म्हणतं, स्वप्न पाहत नाही ती माणसं नाही नि जी स्वप्न पाहतात त्यांचं काही खरं नाही दर्द सारं पेल्यात पिऊन मोकळं होता येतं त्या जमान्यात ते पब मध्ये नशेच्या धुरासोबत उडून जाणारं स्वप्नासारखं उशाशी घुटमळत राहणारं पण झोप न येण्याचं कारण अजूनही नजरेआड थांबून ऐकेक रात्र धुरासारखं उडत जाणारं आयुष्य इतकं खर्ची होऊ दे की बघ, स्वप्न थांबतील...

ज्यांचं कुणीच नसते

उसळत जाणाऱ्या रक्ताला हिमोग्लोबिन आठवलं, आणि थोडा निवांत झाला इथेच तुझी आठवण दाटते हा सुद्धा एक हृदय विकार! खिसा रिकामा असला तरी प्रेम भरपूर करा असं सांगणाऱ्या भूमीत तू सोडून गेलीस, तेव्हा आधार कार्डही होतं माझं. आई वडिलांना वृद्धाश्रमचा रस्ता दाखवून ठेवलेला... पण मग तेही नाही गेले मित्र सारे पुण्याचे, पुणेरी पाट्यांनीच झोडायचे मूळचे तिथले नव्हते तरी. पैसा सर्वस्व आहे हे तुझं सांगणं पटलं होतं मला पण त्यासाठी कुणाला सोडून जावं लागत नाही हे कोण म्हणालं ते आठवत नाही, पण तू नसशील इतकं नक्की. असहिष्णुता प्रेमात असते? हे नेमकं कुणाला विचारु मी धर्माचा संबंध नसला तरी जातीशी लावतातच लोकं हे निमित्त झालं राजकारणाचं वेगळं झाल्याची सुद्धा पार्टी देणाऱ्या देशात तू न सांगता गेलीस. इतकंच काय ते दुःख मी माझं, सेलिब्रेट करतोय आणि फुंकर घालणारं कुणी आजू बाजूला नसताना थंडी सुरू झाली. ज्यांचं कुणीच नसते ते सुद्धा लगेच नाही मरत...!