Posts

गर्दी

कधीच विचार नव्हता केला कोण सोबत आहे माझ्या, कोण माझ्या विरोधात…! त्या काफिल्याला आपलं मानून त्यात सामावून गेल्यावर तिथल्या गर्दीने अचानकच बाह्यांगावर एकही जखम न करता हृदय छातीतून विलग करत काळीजही तिथून खेचून काढलं हातांवरच्या रेषांनाही रस्ते समजून ती गर्दी मला तुडवत गेली… आणि गळण्यासाठी काहीच बाकी नसलेल्या त्या प्रचंड वृक्षाच्या सावलीत विसावा घेत मी विचार करतोय… 'परतणाऱ्या गर्दीसोबत पुन्हा मागे फिरावं'  

कण

मी…, एक कण पृथ्वीच्या आकाराहून मोठा मुंगीच्या पावलांखाली मावणारा जराशा धक्यानेही सर्व नाश करणारा हलक्याशा स्पर्शानेही मातीमोल होणारा मार्गात येणारं सर्व काही तुडवत जाणारा कुणाच्या मार्गात आलो, तर रक्तबंबाळ होणारा नदीचा प्रवाहसुध्दा क्षणात बुजवणारा तिच्या गाळातही कायमचा रुतणारा कुणाचंही डोकं ठेचणारा कुणाच्याही हृदयात सामावणारा वादळ होऊन उध्वस्त करणारा धुळीत राहून संथ वाहणारा कुणाच्यातरी भविष्यावर घाला घालणारा कुणाचातरी भूतकाळ लपवून बसणारा… तू सुध्दा मला कसंही वागावं फक्त एवढच लक्षात ठेव दोष माझा कधीच नसणार! तू भिरकावून दे मला दगड समजून लांब किंवा शेंदूर फासून मला तुला मांडता येईल पूजा मी जीव असून निर्जीव, पायांखाली तुझ्या तू सजीव आहेस म्हणून सांभाळशील मला… मी एक कण, तू सांभाळशील म्हणून कुठेही हरवणारा कशातही सुखावणारा…!

मन

आपल्या मनातला एक कोपरा प्रेममय असतो नेहमीच आपल्या जीवनासाठी कि मनातला कोपरा न कोपरा स्वप्नवत जपून ठेवतो येणाऱ्या सुखांसाठी कि एखाद्या कोपऱ्यात मन निपचित पडून राहतं सरल्या आयुष्यासाठी ?

गावजेवण

इथे माकडाचा खेळ पाहून खुश होऊन टाळ्या वाजवणारे नसले तरी बघणाऱ्यांची गर्दी येत नाही लपवता आणि जीवनाचा प्रश्न इथे उगवतो तेव्हा आपल्याच घरातून नीलाम होऊन उघड्या आकाशाखाली आपली रचली जाते चिता. उरलेली राख फक्त नदीस श्रध्दांजली वाहतात 'आत्म्यास शांती' चा मजकूर देऊन की माझ्या मृत्यूचा आनंद म्हणून गावजेवण देतात ?

अजून

एक बहर सरू दे अजून राहू दे अंतर तुझ्या माझ्यात आता गाठावी जवळीक कशाला स्पर्शावरही होईल आघात एक खंत करू दे अजून राहू दे दुरावा तुझ्या माझ्यात बंध संबंध असंबंध आता कशास गुंफावे हातात हात एक थेंब वाहू दे अजून राहू दे गफलत तुझ्या माझ्यात आठवून विसरलो आठवणी सगळ्या तुही पुरावे जाळून टाक एक सुर्य जळू दे अजून राहू दे अंधार तुझ्या माझ्यात माझ्या सावलीत अधिक असतो तुझ्या अंगाचा अंधार…

रामा तुझ्या नशिबी । पुन्हा वनवास ।।

ते सारेच रामभक्त । असे देशभर रक्त । वाहते तरी कितीदा । राम मंदिरासाठी ।। कुणी चेतविली रथयात्रा । ६ डिसेंबर रंगला । रक्तोत्सव ऋतु बहरला । कोण सुडापायी ।। न वाहिला थेंब । जो होता लालकृष्ण । ते सारे कृष्ण कृत्य । फक्त निष्पापांसाठी ।। कापुनिया कान - नाक । ऐकू येईना विव्हळणं । उमजेना रक्त दर्प । राम - शुर्पणखा ।। खंजीर पाठीत मारला । कसा विश्वास कुणाचा । रामा, तुझाच कित्ता । बालिचा वध ।। जगण्याची इच्छा फार । म्हणुनी हाती तलवार । उभा ठाकला समोर । पैगंबर धर्म ।। किती ठेवावा हिशोब । किती विखुरली घरं । किती धडावेगळी शीरं । साऱ्या देशभर ।। १२ मार्च उजाडला । १३ स्फोटांनी बिथरला । जीव घेणा खेळ पुन्हा । अयोध्येचा सूड ।। त्या उजाड जागी । प्रश्न अजूनही बाकी । नाही मंदिराची खुण । पाडूनही मस्जिद ।। येता निवडणुकीचा काळ । पुन्हा 'होणारं, होणारं' । मंदिराचा जुना हार । नव्या सत्तेसाठी ।। परवा जाळला डबा । किती विव्हळला गळा । अन देह उरला । राखे जैसा ।। जाळूनी अठरा पुरुषं । संगे स्त्रिया पंचवीस । कोवळी पंधरा बालकं । सारे कारसेवक ।। तोच खेळ पुन्हा । पुन्हा तोच खेळ ...

हृदयास छंद जळण्याचा

क्षणिक सहवास… …कुणाचा निरागस उपहास …विरहाचा अधांतरी आधार…  …अंधाराचा उन्माद तुलाही… …दुरावायचा जपलेला… …गंध फुलांचा उरलेला… …बंध गुंतण्याचा रंगलेला… …रंग जखमांचा शमलेला… …साथ जन्माचा पायात… …चाळ प्रेमाचा बेधुंद… …स्पर्श काफिराचा ओठांत… शब्द… प्रियेचा कैफास… आस… फितुराचा हृदयास… छंद… जळण्याचा!