कला

तलवारीच्या म्यानेत बंदीस्त
उद्या येणारा माझा दिवस
आतल्या आताच तीक्ष्ण धारेने
दिवसाचे चार भाग करतो
मी मग्न, म्यानेवर नक्षी कोरतो.
इतक्यात कुणीतरी तलवार उपसून
एका देहाला दोघांत वाटतो
शस्त्राधारी ओठं नुसतीच हलतात  
शब्द कुणीतरी मागून भरतो.
तलवारींच्या आवृत्या वाढत जातात
प्रेतांची प्रतिकृती रेखाटली जाते
आणि कला लोकप्रिय होऊ लागते !
जात, धर्म, समाज, वर्णाचा
कुणीही सहज जन्माला घालतो
कुणाचाही तिरस्कार बेसावध क्षणाला.

तशातच उमलवू पाहतोय दूरवर
प्रेमाचा अंकुर..., कुणी उलट्या काळजाचा !
प्रेयसी मात्र मिठीत विसावून
मिलनाच्या दिवसाचं निमित्त जाणते
'तो आपल्याच धर्मातला, खालच्या जातीचा'
उद्रेकाला तोपर्यंत काळ दाबतो
अन तापवतो हळुवार प्रेम लाव्हा...

'धारेविनही मनं कापली जातात...!'
जुन्या कलेला तिनं पैलू पाडला


Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य