इतकाच प्रश्न उरलाय...

मी जो नव्हतो, तो मी व्हायचा प्रयत्न केला...
आधी तर मी तुलाच प्रमाण मानून चालत राहिलो
पण तू सुद्धा कुठेतरी सर्वस्व अर्पण करून..., शरणार्थी !
मी तुझा गुलाम, तू कुणाचा...
आणि मग भरला बाजारच गुलामांचा

ओझं तसंही जड असते
मग जाणिवांचंच का असेना
म्हणून ओढण्यापुर्वी जागवलं तिला तर
जागृत देवस्थान असल्यासारखं मलाही मूर्तिमंत मानून,
पुन्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा एक कुटील डाव मांडला

'समजत नाही तर सोडून दे', असं कुठेच लिहिलेलं नसताना
मनात शिलालेख कोरून काळे दगड पांढरे केले
तरी शांती ह्यालाच म्हणतात हाही शिलालेख कुठेच नव्हता,
त्या दगडांतून लाव्हा उसळेल आणि ती समज सुद्धा वितळून जाईल.
...समजत नाहीय...? एकदा प्रयत्न तर करून पहा

प्रेमाचा खोल अर्थ सांगू पाहणारे सगळेच
वासनेच्या खोल गर्तेत...!

तुझ्या नजरेची भाषा कळते तशीच
मला पाहणाऱ्या लोकांची नजरही कळते
ती आधी तुझ्याकडे मग माझ्याकडे आणि परत... आणि वर्तुळ पूर्ण करते
आपला नजर संवाद त्यात शाश्वत होता, हे जाणवतंय का तुला?

कसं वागावं, हे सुद्धा आता आपण ठरवू लागलोयत
परकेपणा 'आपलेपणात' भरला जातोय जमेल तितका
त्या परकेपणाची जागा द्वेषही घेऊ शकते म्हणून
मी जो आहे तेच राहायचं ठरवलंय...!

शाब्दिक देवाण-घेवाण जी तुझ्या माझ्यात झाली
स्पर्श संवादही कसा मनमुक्त झाला
त्यांचं काय करावं हा आणि इतकाच प्रश्न उरलाय...

-१४-१०-२०१२

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य